मनातलं...

| लेखक » विशाल तेलंग्रे
लोकप्रिय अवतरण:
लोड होत आहे...


माझ्या मनातलं...

जानेवारी ३०, २०११

संगणक प्रणालींचा यथायोग्य उपयोग करुन यंत्रांना कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदान करण्यासाठी (दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरच्या काळापासून) बरीच मंडळी जगभर अहोरात्र प्रयत्न करताना दिसताहेत. यामधील कित्येकांना अजूनदेखील असे वाटते की शक्य होईल तितक्या जास्त प्रमाणात प्रोग्रॅम-कोडिंग केले की एआय अधिक चांगल्याप्रकारे डेव्हलप करता येणे शक्य आहे. पण या लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन असणाऱ्या वैज्ञानिकांच्या(+प्रोग्रॅमर) मते—एआय मागील मूळ संकल्पना आणि एआयचे मानवी भविष्यावरील इष्ट/अनिष्ट परिणाम या बाबी ज्याला योग्यरीतीने कळून बऱ्यापैकी समजल्या आहेत, तोच एका अतिशय निराळ्या लॉजिकद्वारे आजच्या संबंधित क्षेत्रातील तत्सम् वैज्ञानिकांसमोरील तिढा सोडवू शकेल, तेही अगदी येत्या काही काळातच! तो नक्कीच टर्मिनेटर सीरिज मधला जॉन कॉनर नसणार—कारण इथे "उपजत" कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रांशी लढणं नाहीये सध्यातरी! मीदेखील याच मताचा आहे.

जानेवारी १५, २०११

By any means, I'll survive for years, I hope so.

डिसेंबर १२, २०१०

(बळजबरीने) एखाद्या गोष्टीचे विचारमंथन करणं किंवा त्या गोष्टीची कल्पना करुन त्यात रमणं म्हणजे स्वप्न वा दिवास्वप्न असतं का? माझं उत्तर आहे, नाही. स्वप्न ही एक अनैच्छिक बाब आहे, जी मानवाच्या मनाच्या रोधाची कसलीही तमा न बाळगता तो झोपी असताना किंवा जागे असताना घडते. एव्हाना ज्या गोष्टींबद्दल आपण स्वतःहून कल्पना करण्यात असमर्थ असू शकतो किंवा तसं करण्याची आपली कधी स्वेच्छादेखील नसते, अशा प्रकारच्या घटना असलेली स्वप्ने (मलातरी) नेहमी पडतात. याअर्थी कित्येकदा ज्या गोष्टींबद्दल तुम्ही फार पूर्वीपासून विचार करणं सोडून दिलेलं असतं किंवा ज्या गोष्टींमध्ये आवड नसतांना किंवा च्याबद्दल फारशी माहीती नसतानादेखील त्यासंबंधित गोष्टींची स्वप्ने पडतात. मला नव-नवीन तंत्रज्ञान, अवकाशवेध व च्याशी निगडित गोष्टींमध्ये सर्वांत जास्त आवड आहे, आणि माझे उद्दिष्ट देखील त्याच मार्गाला आहे. पण खरं सांगायचं झालं तर, मी आजवर यांवर अनेक गोष्टी, पुस्तके, सायन्स-फिक्शन चित्रपट पाहूनसुद्धा मला आतापर्यंत यासंबंधित एकही स्वप्न पडल्याचं आठवणीत नाही! उलट येथे एक उदाहरणच द्यायचे झाले तर: मी मागे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये लोणारला[][] गेलो होतो, तो वऱ्हाडी प्रदेश मला अनोळखा—परत येतेवेळी तेथे बसस्थानकावर सुमारे दीड तास बसची वाट पाहताना ती समोर बसलेली होती, सुंदर होती हे सांगणं म्हणजे तीच्या सौंदर्याच्या अपमान केल्यासारखंच होईल, एखाद्या स्वर्गसुंदरीप्रमाणे निरागस, मदमोहक निळसर डोळ्यांची ती ललना, मला समवयीन. मी तिच्याकडे सारखा पाहत होतो, पण गर्दी एवढी की नंतर बसमध्ये चढताना मी सर्व काही विसरुन गेलो. नंतर बुलढाण्याला जेव्हा बसमधून मी खाली उतरलो तेव्हा कळालं की तीसुद्धा आपल्याच सोबत होती येतेवेळी. तीदेखील तिथेच उतरली, ह्म्म, वडील होते तिच्यासमवेत बहुतेक. जाताना तीने माझ्याकडे पाहिले होते हे लक्षात आहे, पण संध्याकाळचे सात वाजले असल्याकारणाने ती माझ्याकडे पाहून हसली की नाही हे मंद उजेड असल्यामुळे मला दिसले नव्हते, शिवाय बसमध्ये नव्यानेच ओळखी केलेल्या मित्राला टा-टा करताना ती कधी तेथून अदृश्य झाली, हे मला कळालेच नाही. त्यावेळी लगेच मावशीच्या गावी परत जाण्यासाठी धाडमार्गे पुणे जाणारी निम-आराम बस लगेच मिळाली. ती रात्र तर सोडाच, पण कालपर्यंत मला ती घटना आठवली नाही नि मी त्याबद्दल विचार देखील केला नाही. दीड महिन्यानंतर काल, आज अशा सलग दोन रात्री मला फक्त तिची स्वप्ने पडली, काहीच देणंघेणं नसतानादेखील! आणखी एक गोष्ट—मला जी गोष्ट मिळणार नसेल तर मी त्या गोष्टीचा नाद सोडतो, हा माझा मला अनुभव आहे, तरीही अशी स्वप्ने मला पडली अन् अनेकदा पडतात. आणखी एक उदाहरण सांगायचे झाले तर सध्या परीक्षा चालू आहे, उद्याच्या, परवाच्या पेपरचा माझा १ टक्कादेखील अभ्यास अजून झालेला नाहीये, मी अधून-मधून नापास, एक्स होण्याबद्दल विचार करत असतो, पण स्वप्नांत असं काही घडल्याचं मला आठवत नाही! आणखी बरीच उदाहरणे आहेत, ज्यावरुन तरी मी कल्पित विचार आणि अनैच्छिकरीत्या पडलेली स्वप्ने यांतील फरक ओळखू शकतो, मांडू शकतो.

डिसेंबर १२, २०१०

अगदी लहान-सहान गोष्टींमध्ये तुम्ही इतके गुरफटून जाता की जे तुमचं पूर्वी कधीकाळी एकमेव उद्दिष्ट होतं, ज्यासाठी तुम्ही दिवस-रात्र एक करण्याचा निश्चय केला होता, ते उद्दिष्टच तुम्ही हरवून बसता. समाज, दैनंदिनी, प्रपंच इत्यादी गोष्टींची महत्ता जरी खूप मोठं असलं तरी याच गोष्टी तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांपासून दूर लोटण्यासाठी परस्पर जबाबदार असतात, याची तुम्हाला प्रचिती असेलच, हो—रोजचं घरातलं भांडण, कॉलीज/ऑफिसातले सहकार्‍यांची असलेले केवळ व्यावहारिक संबंध व त्यातून उद्‍भवणारे वैर, प्रेम-वियोग इत्यादी इत्यादी गोष्टी माझ्यामते क्षुल्लकच आहेत आणि असाव्यात तुमच्या उद्दिष्टांपुढे; त्यांमध्ये न गुंतण्याचा सदैव प्रयत्न करत राहणेच योग्य ठरेल. उद्दिष्टपूर्तीकडे जाण्याचा हा मार्ग असू शकतो, नाही?

डिसेंबर ११, २०१०

सलगी वाढली की आपसूकच दोघांमध्ये एक वेगळा बंध निर्माण होतो, हा भावबंध जुळायला वेळ लागू शकतो मात्र तो तुटायला केवळ काही क्षणांचीच गरज भासते, अशावेळी हा बंध टिकवताना झालेली नेहमीची फजिती आपल्या मनात कायमचे घर करुन टाकते. सुरुवातीच्या एखाद्या नुकत्याच उमललेल्या टवटवीत तरल पर्णाच्छादित पालवीचे रुपांतर आता एखाद्या रुक्ष वाळलेल्या पर्णात झालंय, असा भास झाल्याशिवाय राहत नाही. पैलतीरावरची साद ऐलतीरावरच का विरुन जात आहे, असा विरह-युक्त प्रश्न कोरड्या कंठात उत्सुकतेने उत्तराची वाट पाहत राहतो, कंठ दाटून यायला एवढंच कारण पुरेसं असतं, नाही? वियोगाचं, बंध तुटण्याचं कारण काही का असेना पण स्वतःच्या वागण्यात, चालण्यात, बोलण्यात अनपेक्षितता असतेच, म्हणून काय नेहमी आतली प्रचंड हुरहुर बाहेर दाखवण्यासाठी फक्त याच गोष्टींची साथ घेणं मला तरी बरोबर वाटत नाही. हे असं दुःखाचं प्रचंड मानसिक ओझं डोक्यावर उचलून चालण्याचा त्राण आपल्या अंगी आता उरलेलाच नाही, अशी गैरसमजूत करुन घेणंच मुळी हरण्याचं लक्षण आहे. स्वल्पविराम असावा ना, मी कुठे नाही म्हणतोय? पण स्वल्पविरामाची मर्यादा असतेच ती किती, मागचं विसरुन समोर जावं लागतंच! जिद्द असली की तेवढ्याच उमेदीने पहिल्यासारखं पुढंही जगता येतं, हे मी अनुभवतोय.

डिसेंबर ७, २०१०

If you not found there, you've to invent it.

डिसेंबर २, २०१०

एखाद्याला जाणून-बुजून नाहक दुःखी करण्यात मला कसलाही आनंद मिळत नाही त्यामुळेच मी तसं स्वतःहून कधी करत देखील नाही. एकूणच काय, कुणाला सुखी-समाधानी करण्याची जबाबदारी माझ्यावर असू नये, असं मला नेहमी वाटतं... जो कोणी माझ्यावर विसंबला—माझ्यामुळे त्याला न जाणे कशामुळे तरी, पण त्रास, विरह, दुःख इत्यादी गोष्टी सहन लागल्या, तर त्याप्रसंगी मी नक्कीच मला त्यासाठी जबाबदार समजणार नाही.

»

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे