कव्हर्ट् वन: दि हेइडिश् फॅक्टर

बुधवार, १ डिसेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
रात्री:

आजचा दिवस जरा कंटाळवाणाच गेला. पीएलच्या सुट्या चालू असल्यामुळे दात न घासण्याला आज सलग एक आठवडा पूर्ण झाला असावा. ते तरी बरं की हल्ली अंघोळ करण्याचा तरी कंटाळा करीत नाही. अंघोळीच्या अगोदर अद्रक टाकून काळ्या-पाण्याचा गरमागरम चहा पिण्याची माझी नियमीत सवय, पण आज तो सुद्धा लवकर मिळाला नाही! :( परिणामी कसंतरी व्हायला लागलं (भूक लागल्यावर होतं ना तसं!) अन् माझी अंघोळ होते न् होते तोच मम्मीनं (नाही पप्पांनी!) मस्तपैकी वाळलेल्या लाल-मिरच्यांचा तडका मारलेली डाळ बनवून दिली, काय झणझणीत वास होता राव! :P नावासारखंच माझं पोटसुद्धा "विशाल" आहे, पुढ्यातल्या अन्नाला मी कधीच नाही म्हणत नाही! सकाळ जरी चांगली गेली असली तरी ऊन जरा जास्तच तापत असल्यामुळे अख्खा दिवस खूर्चीवर बसून जांभळ्या देत-देत घालवला! अभ्यासाचं सांगण्याची गरज नसावी! ;) संध्याकाळी चारच्या सुमारास आणखी एकदा "असंच" जेवन करुन घेतलं, बहिणीला भूक लागलेली असतानादेखील! नंतर मस्तपैकी एक पिच्चर पाहावा या हेतूनं लॅपटॉप उघडला.

"कव्हर्ट् वन: दि हेइडिश् फॅक्टर" हा हॉलिवूडपट क्षणार्धात सुरु झाला देखील... आधी सांगीतल्याप्रमाणे आजचा दिवसच बोअर होता माझ्यासाठी... त्यात या पिच्चरनं मूड आणखीनच बोअर करुन टाकला. जरी विषय चांगला, कथानक चांगलं, पात्र साजेशी असली... तरी चित्रपट एवढा स्लो अन् कंटाळवाणा बनवलाय ना की पाहायला माझ्या अगदी जीवावर आलं होतं! मला थुसिडाइड्स मधील ग्रीकच्या प्लेगच्या प्रसंगांची आठवण झाली चित्रपट... असो.

कथानक असं आहे,
सुरुवातीला काही लोक अतिशय विलक्षण पद्धतीने तात्काळ मरतानाचे प्रसंग आहेत. त्यानंतर बर्लिनमध्ये काम करीत असलेल्या कव्हर्ट वन् या अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेची एजंट रॅशेल तीच्या दोन सहकारी एजंट्सना मारुन पळून जाते. रोगजंतू असलेली कुपी दहशतवाद्यांकडून हस्तगत करण्याची कामगिरी तीच्यावर सोपवलेली असते. पण तीचे सहकारीच तीच्या जीवावर उठले आहेत, हे तीच्या लक्षात आल्यावर ती त्यांना ठार करुन तिथून पळ काढते. याच वेळी कव्हर्ट् वनचा माजी एजंट डॉ. जॉन स्मिथ त्याच्या डॉ. सोफी या प्रेयसीसोबत तेथील एका कार्यक्रमात सहभागी असतात. त्याचा पुर्वीचा एक एजंट-मित्र त्याला तेथे भेटतो व नक्कीच काहीतरी अघटित घडणार असं सांगतो. याच क्षणी चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवलेल्या मृत्यूंच्या प्रसंगांवरुन पुढील कथानकाची पुसटशी कल्पना येते. हे मृत्यूंच्या घटनांचा छडा लावण्यासाठी स्मिथ व सोफीला लगेच अमेरिकेत पाचारण करण्यात येतं. भयानकरीत्या अचानक ओढवलेल्या या मृत्यूंच्या घटनांबद्दल संशोधन करत असताना अमेरिकेच्या सिआयए या गुप्तहेर संस्थेमार्फत अफगाणिस्थानमधील चढायांच्या वेळी आपल्याच सैनिकांमध्ये "हेइडिश्" या रोंगजंतूंचा फैलाव करुन काही गुप्त-प्रायोगिक चाचण्या घेतल्या गेल्या असल्याचं स्मिथला कळतं... तो लगेच ही गोष्ट सोफीला कळवतो. पण सगळीकडे दहशतवादी घुसलेले असल्यामुळे सोफीचा नाहक बळी जातो. आपल्याच लोकांनी बनवलेले रोगजंतू आता आपल्याच लोकांचे प्राण घेतील, या सत्याची जाणीव स्मिथला होते. त्या प्रयोग-चाचणी मध्ये त्याकाळी सिआयएसोबत सहभागी असलेल्या एका औषधं बनवणार्‍या कंपनीकडे या हेइडिश् व्हायरस विरोधात वाचण्यासाठी बनवली गेलेली रोगजंतूनाशक लस उपलब्ध असल्याचे स्मिथला कळते. दहशतवाद्यांच्या या जैव-युद्धावर नंतर स्मिथ कशाप्रकारे पाणी फिरवतो याचा थरारक अनुभव घेण्यासाठी चित्रपट पाहणेच औचित्याचे ठरेल, नाही... ;) चित्रपटाचा क्लायमॅक्स अपेक्षेनुसार असायला हवा होता तितका रोमांचक नाहिये मात्र! :-\

चित्रपटाबद्दल अधिक माहितीसाठी दुवा: [http://www.imdb.com/title/tt0493327/]
» नोंद-प्रकार: , ,
हेरंब म्हणाले...

विशाल, म्हणून मी नेहमी चित्रपट बघायच्या आधी आय एम डी बी वरून त्याचं रेटिंग बघतो. जर रेटिंग ७ च्या खाली असेल तर त्याच्या वाटेलाच जात नाही.. :)

विशाल तेलंग्रे म्हणाले...

@हेरंब,

ह्म्म, ते तर आहेच म्हणा! यापुढे आय.एम.डी.बी. एकवेळ नजरेखालून घालत जाईन...

अपर्णा म्हणाले...

विशाल चित्रपटाच काही मी वाचल नाही पण पहिला परिच्छेद एकदम मागे घेऊन गेला....

विशाल तेलंग्रे म्हणाले...

@अपर्णा,

;)

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे