दि दा विन्ची कोड

गुरुवार, २ डिसेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
सकाळी:

रात्री "दि दा विन्ची कोड" हा अतिशय अद‍भूत अशा रहस्यमय घटनांनी भरलेला हॉलिवूडपट पाहिला.

डॅन ब्राउन यांच्या २००३ साली प्रकाशित झालेल्या याच नावाच्या जगभर खूप विरोध झेललेल्या विश्वप्रसिद्ध पुस्तकावर हा चित्रपट आधारलेला आहे.

चित्रपटाच्या कथानकाचा संक्षिप्त सारांश याप्रमाणे,

इतिहासकालीन संकेतचिन्हांचा व चित्रांचा खोलवर अभ्यास असलेले संशोधक रॉबर्ट लॅन्गटन् हे एका परिसंवादानिमित्त पॅरिसमध्ये असतात. झायलस नावाचा एक तरुण तेथेच असलेल्या एका चर्चमध्ये जॅक्स सुनिरि या चर्चच्या पाद्र्याचा खून करतो. टीचर नावाच्या व्यक्तिच्या सांगण्यावरुन तो हे कृत्य करतो, तो "होली ग्रेल" बद्दल जॅक्सला विचारत असतो. मरण्यापूर्वी जॅक्स झायलसला ते "होली ग्रेल" पॅरिसमध्येच "रोज लाइन"च्या खाली दबलेले असल्याचे सांगतो. झायलसने बंदूकीची गोळी मारल्यानंतर जॅक्स आपल्या शरीरावर काही संकेतचिन्हे लिहून ठेवतो, तसेच आजुबाजुला फिबोनाकी संख्यामाला, काही गुढ रहस्ये असलेली वाक्येसुद्धा लिहितो. खूनाची बातमी कळताच पॅरिसमधील कॅप्टन बेझू हा त्या हत्याकांडाचा तपास सुरु करतो. संकेतचिन्हांचा अर्थ लावण्याचं निमित्त करुन तो रॉबर्ट लॅन्गटनला त्या हत्येच्या ठिकाणी घेऊन येतो. यावेळी जॅक्सची पुतणी असलेली सोफी नावाची तरुणी, जी गुढ रहस्यांची उकल करण्यात पटाईत असते, रॉबर्टला तेथे भेटते. कॅप्टन बेझू रॉबर्टला या हत्येत गुंतवत असल्याचे सोफी रॉबर्टला पटवते व ते तेथून पळ काढतात. नंतर दोघांमध्येही या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण व इतिहासकालीन गोष्टींचा संदर्भ व्यवस्थितरीत्या हाताळत विश्लेषण करणारे संभाषण-प्रसंग चित्रपटात येतात. सोफीकडे एक अनेक बिंदू असलेली प्राचीन किल्ली असते. रॉबर्ट अन् सोफी ती किल्ली घेऊन स्विस बँकेत जातात; जॅक्सने मरतेवेळी लिहून ठेवलेली फिबोनाकी संख्यामाला त्या बँकेतील खात्याचा खातेक्रमांक असतो, त्याआधारे तेथून "होली ग्रेल" शोधण्यासाठी असलेला नकाशा ते मिळवतात, पण तो नकाशा एका कोडने ताळेबंद असलेल्या एका छोट्याश्या कुलुपात बंद असतो, जो पाहण्यासाठी केवळ एकच संधी मिळते, नाहीतर तो नकाशा पुसुन जातो. आता रॉबर्टला पुरते कळून चुकते की तो आणि सोफी एका अतिशय रहस्यमय व अतिप्राचिन काळापासून चालू असलेल्या धार्मिक वादाच्या भोवर्‍यात गुरफटले गेले आहेत.
होली ग्रेल, रोज लाइन, लिओनार्दो दा विन्ची व त्याची पेंटिग इत्यादी गोष्टींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी रॉबर्ट व सोफी हे दोघे लेइ तिबिंग या इतिहासकाराकडे जातात. तेथे लेइकडून कळते की हे सर्व मॅटर किती ढवळाढवळीचे आहे. लेइ सांगतो की, लिओनार्दोच्या पेंटिगमधील येशू ख्रिस्ताच्या बाजूला बसलेली मेरी मॅग्डालीन ही महिलाच या सर्व गोष्टींचे मुळ आहे. इतिहासात या गोष्टीची जास्त नोंद नसण्याचे कारण अन् मॅग्दालीनला "रांड" म्हणून जगासमोर दाखवण्याचे काम त्या काळच्या कट्टर धर्मप्रवाही समर्थकांनी केले होते. येशू ख्रिस्ताला अतोनात यातना देऊन या धर्ममार्तंडांनी येशूला मारुन टाकले, तथापि मॅग्डालीन व येशूचे सर्वांत जवळचे चार मित्र तेथून पसार झाले. लेइ सांगतो की येशू व मेरीमध्ये शारिरिक संबंध होते, पसार होतेवेळी याच कारणामुळे मेरी मॅग्डालीन गर्भवती होती, तीने नंतर "सारा" नावाच्या मुलीला जन्म दिला. सोबतच्या चार लोकांनी मॅग्डालीन अन् सारा यांचे संरक्षण व काळजी घेण्याची जबाबदारी उचलली. "दि प्रायरी ऑफ सियान" या नावाने ह्या चार लोकांनी त्यांची वंशवृद्धी करत व त्यावेळची "मॅग्डालीन-सारा"ची घटना जगापासून गुप्त ठेवण्याचं काम हजारो वर्षांपासून चालू ठेवलं. तरीसुद्धा कट्टर धर्मवाद्यांना येशूच्या संपूर्ण वंशाचा नाश करायचा होता, यामुळे आजवर "प्रायरी ऑफ सियान" आणि कट्टर धर्मवाद्यांमध्ये कित्येक चकमकी व मोठ्या लढाया इतिहासापासून आतापर्यंत घडल्या असल्याचे लेइ रॉबर्ट अन् सोफीला सांगतो. आजही येशूचा वंशज जिवंत आहे, अन् तोच वंशज "होली ग्रेल" आहे, असे लेइ स्पष्ट करतो. होली ग्रेल म्हणजे लिओनार्दोच्या पेंटिगमधली मॅग्डालीन महिला होती, जीच्यामुळे संपूर्ण ख्रिश्चन धर्माला धोका निर्माण होईल, अशी समज बाळगून जगातील सर्व चर्चमधील बिशप, ओपस देइ, अन् पोप येशू-मॅग्डालीनच्या वंशजाला नष्ट करण्यासाठी हजारो वर्षांपासून प्रयत्नशील होते. रॉबर्ट अन् सोफीकडे ह्याच होली ग्रेलपर्यंत पोहोचण्याचा ताळेबंद नकाशा असतो. सोफीचा आजोबा जॅक्स हा या होली ग्रेलचे संरक्षण करणार्‍या चार प्रायरी ऑफ सियानच्या चार सदस्यांपैकी एक होता, हे सोफी, रॉबर्ट व लेइला कळते. जॅक्सनंतर इतर तीन संरक्षकांची देखील हत्या करुन झायलस टीचरच्या सांगण्यावरुन लेइच्या घरी येऊन तो नकाशा हस्तगत करण्याचा प्रयत्न करतो. पण लेइ त्यालाच पकडतो, यादरम्यान कॅप्टन बेझू पोलिसांसह तेथे येतो. पण लेइ, रॉबर्ट लॅन्गटन, सोफी अन् बंदी बनवलेला झायलस हे सगळे जण लेइच्या खासगी विमानाद्वारे लंडनला रवाना होतात. तेथे पोलिसांना चकमा देत ते चर्च टेम्पल येथे पोहोचतात, जेथे अनेक टेम्प्लार्सना गाडलेले असल्याचे त्यांना कळते. पण ते चुकीच्या जागी आल्याचे लगेच रॉबर्टच्या लक्षात येते. लेइ, लेइचा पीए, झायलस हे सर्व मिळालेले असल्याचे रॉबर्टला कळून चुकते. हे चित्रपटाच्या उत्तरार्धातील प्रसंग, "A Pope" वरुन सर आयझॅक न्युटनचा संबंध, त्याच्या डोक्यावर पडलेल्या "APPLE" मागची कथा, इत्यादी गोष्टी थेट चित्रपट पाहूनच जाणून घेणेच योग्य ठरेल, जर येथेच सर्वकाही सांगीतले तर सगळी मजा, रोमांच, उत्सुकता विरुन जाईल, असे मला वाटते. त्यासाठी चित्रपट बघावाच लागेल!

चित्रपटाच्या अगदी शेवटी सोफी किंवा रॉबर्ट लॅन्गटन यांच्यापैकी [********] कोण असतो, हे मात्र जे दाखवलं गेलंय, त्याच्याच विरोधाभासी अन् आणखीनच गूढता वाढविणारे आहे, तरी हाच शेवट मला अधिक आवडला.

एकूणच चित्रपट शेरलॉक होम्सच्या रहस्य न् साहसी कथांप्रमाणे वाटला, खूप गोष्टींची उकल अतिशय विस्मयरीत्या होण्यामुळे चित्रपट पाहतांना लक्ष विचलित होत नाही.

चित्रपटाबद्दल आणखी माहीतीसाठी दुवा: [http://www.imdb.com/title/tt0382625/ ]
» नोंद-प्रकार: ,
अपर्णा म्हणाले...

picture peksha pustak jaast interesting aahe as mala watat....wachun bagh....mi aadhi pustakach wachala hot....

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे