थंडी वाढलीय!

रविवार, १२ डिसेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
सकाळी:

खूप थंडी आहे आज[], मार्गशीर्षच्या उत्तरार्धात असह्य वाटणारी पुर्वी गावाकडं असतानाची प्रचंड थंडी इकडे औरंगाबादेत कधीच जाणवली नाही, शहरात वास्तव्य करत असताना हा असा खुळचट विचार डोक्यात येणं म्हणजे हास्यास्पदच आहे! ;) दुपारचे बारा वाजताहेत, छानपैकी ऊन पडलंय, पण हुडहुडी भरल्यासारखं राहून-राहून वाटतंय; चांगली जाडजूड रग अंगावर घेऊन मस्त झोप काढण्यासारखा विचार जरी डोक्यात डोकावला असला तरी मी तसं करणार नाही—कारण मला दिवसा झोप घेण्याची सवयही नाही, आणि मला ते पटतसुद्धा नाही! गच्चीवर जाऊन आलो जेवण केल्या-केल्या, चहूबाजूंना धुकं होतं की धूर हे सांगणं जरा कठिण आहे, पण चलता है! मस्तपैकी पंधरा-एक मिनिटं स्वैर विहार केला, मजा येते थंडीमध्ये मध्यान्हाच्या सुमारास ऊन्हात बागडतांना, एक विलक्षण आनंदच मिळतो की...! आज रविवार आहे तर, सालं आमचा सकाळ आत्ता आलाय, च्यायला! "सप्तरंग"ची ती तेवढी वाट मी पाहतो दर रविवारी, का कोण जाणे! ;)

असो, आता अभ्यासाकडे लक्ष द्यावं म्हणतो. उद्या 'जावा'चा पेपर आहे, त्यानंतर 'डेटाबेस मॅनेजमेण्ट सिस्टीम'चा-१५ डिसेंबरला; मग काय—सुट्ट्याच आहेत! :P

अरे हो, काल रात्री एक नाही, दोन नाही तर सलग तीन पिक्चर पाहिले! :P 'पेइचेक', 'गन्स ऑफ नेव्हॅरॉन', 'दि सम ऑफ ऑल राँग्ज्' हे तीन हॉलिवूडपट. परीक्षा झाल्यानंतर यांची थोडक्यात समीक्षा मांडण्याचा प्रयत्न करेन.
» नोंद-प्रकार: , , ,

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे