काळोख

बुधवार, १ डिसेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
रात्री:

बाहेर रातकिड्यांची सहन न होणारी अविरत किरकिर केव्हापासूनची चालू आहे. अगदी सहनशीलतेच्या पलिकडे गेलाय त्यांचा हा कमी-अधिक फ्रिक्वेन्सीचा भंकस गोंगाट... वाटतंय दूर कुठेतरी पळून जावं, अगदी चिड येते कधी-कधी अशा प्रसंगी... माझं आजवर एकदाच डोकं दुखल्याचं माझ्या आठवणीत आहे, पण हे असले विचित्र अनुभव तर हल्ली नेहमीचेच होऊन बसले आहेत. जेव्हा ह्याबद्दल विचार करण्याच्या नादात स्वतःला हरवून बसतो ना, तेव्हा त्या अपरिचित ठिकाणाहून परत येणाचा देखील त्राण उरत नाही देही (नाही मनी!)... सर्व जग कसं विक्षिप्त वाटतंय... यावर मात करण्यासाठी मी काय करु शकतो, काय करु शकेन, काय करु, अशा कित्येक प्रश्नांची उत्तरेच गवसत नाहीयेत... आठवणी? नाही नाही, हा दिवास्वप्नं वगैरे काही प्रकार नाही... शून्यभाव चेहर्‍यावर चढताना दिसत आहे, डोळ्यांच्या पापण्या जरी थकून लवण्याचा प्रयास करीत असल्या तरी डोळ्यांना मात्र ते उघडेच हवे आहेत, शक्य आहे का हे? झोपमोडच म्हणावी लागेल ही? नाही, हा तर स्वतःवरच अत्याचार होईल, शरीराच्या अनैच्छिकतेविरुद्ध मी माझे हुकूमी घोडे दौडत कित्येक सुंदर-सुंदर माळरानं तुडवत चालल्याचं मला स्पष्ट दिसतंय... अगदी असह्य वाटतंय आता... गाल दुखू लागलेत अगदी (उरलेत तरी कुठे म्हणा आता!), तोंडातली लाळ गिळण्याचा असफल प्रयत्न होतांना दिसतोय, पण त्याकडे मला लक्ष घातल्याशिवाय यश येणार नाही, हे निश्चित... मान पण दुखायला लागलीय... कारण? ह्म्म, काय कारण असावं... अरेच्चा, आठवलं की, मी हे टंकत बसलोय ना, डोळे फाडून-फाडून लॅपटॉच्या एलसीडी स्क्रीनवर शंभर टक्के ब्राइटनेस सह मी काही क्षणांपासून मनातले भाव उतरवीत आहे... असो... भैया (धाकटा मावसभाऊ) पिक्चर पाहायचा पाहायचा करीत झोपला देखील मागे... त्याला उठवतो आता... मलाही रातकिड्यांची त्रासदायक किरकिर ऐकण्याचा कंटाळा आलाय अगदी... पिक्चर पाहणं हा आता पर्याय आहे नाही एक निमित्त आहे... तूर्तास नोंदस्टॉप!
» नोंद-प्रकार: , ,
अनामित म्हणाले...

ए बाबा तू ठीक आहेस ना?

विशाल तेलंग्रे म्हणाले...

@आल्हाद,

ठीक आहे रे, होतं राहून राहून असं. आताशा सवयच जडलीय मला अशा प्रकारचे अनभिज्ञ न् कटू प्रसंग अनुभवण्याची...

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे