कामे हरवली आहेत!

शनिवार, १५ जानेवारी, २०११ | लेखक » विशाल तेलंग्रे
संध्याकाळी:

पार बट्ट्याबोळ झालाय. (असं राहून राहून वाटतंय खरं.)

नवीन वर्षाच्या निमित्ताने [वेळेचे नियोजन ]चा पुरेपूर फायदा करून घ्यायचाच, असं ठरवलं नि अगदी काही मिनिटांत ते वास्तवात अवतरवलं देखील. एक छानपैकी २०० पानांची सुंदरम् ची २ बाय ३ आकाराची वही मी यासाठी वापरली—आठवताहेत ते क्षण, आज आठवडा उलटलाय नेमाने अगदी. खरं पाहता, सोमवार-मंगळवार पर्यंत वहीतील टू-डू लिस्टमधील सर्व "हॅव टू-वॉन्ट टू" कामे फत्ते होत असल्याने जामऽ खूष होतो, पण नंतर का कशामुळे मला त्या वहीचा विसर पडला. मुळात दर दोन दिवसांनी तरी "या" वहीत नोंदी टिपत जा, असं सांगणारी देखील टिपणं मी त्या वहीत खरडून ठेवली होती—ह्या अख्ख्या महिन्याभराकरीता. काल कातरवेळी नकळत मला त्या वहीची आठवण झाली अन् मी इकडे-तिकडे, शक्य असेल जिथे-तिथे शोधाशोध केली—पण एवढं सगळं करूनदेखील ती सापडत नाहीये; आजदेखील मी सकाळी व नंतर दुपारी बराच काळ ती वही शोधण्यात दवडला, पण ती नाही ना गवसली अजून. कुठे गेली असेल, कोणास ठाऊक? परांगदा (आय मीन नौ दो ग्यारह!) तर झाली नसेल; आधीच मी एवढा आळशी नि विसरभोळा आहे की खायाचं नि ढोसाचं देखील माझ्या लक्षात राहत नाही (बरेचदा). च्यायला आठवताहेत, बरीच कामं लिहून ठेवली होती तीत, पण आता ईवळत ("विव्हळत"चा अपभ्रंश असावा बहुधा) बसण्यात काय उरलंय?

परवा मम्मीने पेप्रांच्या रद्दीत त्या रद्दीवाल्याला तर नाही ना देऊन टाकली, चक्क रद्दीच्या भावात? ऑऽयला, तसंच काही झालं असणार.

आता काय, दिप्याकडून आणखी एखादी सुंदर वही (हं सुंदरम् चीच!) घेऊन येईन सोमवारी. तोवर बसतो डोके आदळत नि—"कामे हरवली आहेत, कामे!"—चा जप करीत; सगळं काही निमित्त मात्र उरलंय. (असं काय व कशासाठी म्हणून म्हणावं बरं, ती काय माझी गर्लफ्रेंड वगैरे कोणी नव्हती तरीही?)

तसं कुठलंच मोठ्ठं काम खोळंबलं असण्याची/जाण्याची शक्यता नसावी, तरीदेखील तशी ती शक्यता नाकारताही येत नाही. :(

---
 
मकर संक्रांत म्हणजे सण म्हणजे माझं खाण्याचं मरण—सकाळची शिळी वांग्याची भाजी खाल्ली. नाही म्हणून तिखट-खरपूस-तेलकट असलेली थोडी भजी देखील तोंडी लावली. आणि नाहीच म्हणून शेवटी थोडी खीरदेखील वरपून (म्हणजे चक्क ताटाला तोंड लावून पिण्याचा वेडगळ प्रकार!) घेतली. तीळ-गूळ घेण्यासाठी घरोघरी फिरणं आपल्याला नाय जमायचं आता, पॉट अगदी फुल्लऽ झालंय. ;) (संक्रांतीलाच तीळ-गूळ देण्या-घेण्याचा प्रकार असतो ना? याचादेखील मला विसर पडलाय बहुधा!)
» नोंद-प्रकार:

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे