ये जो चल रहा है...

गुरुवार, १६ डिसेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
रात्री:
अस्वस्थ फील करतोय. काल पेपर संपल्यानंतर सगळ्यांनी पार्किंग मध्ये भेटायचं असं ठरलं होतं. पण का कशामुळे, मी पेपर संपल्यानंतर लगेच कॉलीजमधून बाहेर पडलो आणि कोणाला काहीच न सांगता तसाच घरी आलो. त्यावेळी आणि आता यावेळी सुद्धा कोणाशीच जास्त बोलण्याच्या मनःस्थितीत मी नव्हतो आणि नाहीये. का कोण जाणे, पण हा विचित्र बदल माझ्यात का घडून यावा, बहुतेक वेळा कारण—'एकटे पडल्याची भावना' एवढंच असतं. त्यावर तोडगा म्हणजे दृष्टीकोनात सकारात्मकता आणणं—ह्या गोष्टीचंच मला सर्वांत जास्त जीवावर येतं. आज कृष्णा, दिलीप, अमोल, आशु, स्नेहल यांचे फोन, मेसेजेस येऊन गेले, पण मी ना ते रीसीव्ह केले ना ही त्यांना उत्तरे पाठवली. एखाद्या अपराध्यासारखे विक्षिप्त जगणे कसे असते, अगदी तसेच जगत असल्यासारखा मला राहून-राहून भास होतोय. गुन्हा तसा मी काहीच केलेला नाहीये, एक तर त्यांच्यामधील कोणी मला एकाकी पाडण्याचे कृत्य करीत असावे म्हणा किंवा मीच त्या सगळ्यांपासून स्वतःहून दूर होत आहे. विचारांचा येथे काही संबंध नाही, जे डोळ्यांनी उघड आहे, त्याच्यावरच विश्वास ठेऊन मी जीवन व्यतीत करतोय नि करेन. हे चूक असुनसुद्धा विलगतेच्या मार्गाकडे मी अनैच्छिकपणे ओढला जातोय, पण असं असूनही मला काहीच संवेदना जाणवत नाहीये की ज्यामुळे मला कसल्याही प्रकारचे दुःख वा तसा काहीसा मानसिक त्रास होईल म्हणून. प्रकाशमय खोलीतून दूरवर असणार्‍या दुसर्‍या एका प्रकाशमय बिंदूकडे कित्येक अंधार्‍या खोल्यांतून प्रवास करण्याचा मी निर्धार पक्का कधी केला, याचे मला स्मरण नाही. पण जे काय घडतंय ते सर्व काही आता डोक्याच्या वरचा खेळ झालाय असं वाटतंय. चालू द्यावं म्हणतोय, बघूयात कुठे व किती तीव्रतेचे दणके बसतात ते.

आजच्या दिवसाबद्दल सांगायचं झालं तर काही विशिष्ट नाही, उपक्रमवर 'प्रतिकर्षित करणारे गुरुत्व नसते काय? ' हा चर्चा प्रस्ताव टाकला. बरीच कामं आहेत क्यु मध्ये, पण त्यांना हातात घेण्याची देखील मी तसदी घेत नाही म्हणजे नवलच.
» नोंद-प्रकार: ,

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे